पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा यमुनानगर येथील जलतरण सुरू करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सुमारे दीड वर्षांपासून हा तलाव बंद अवस्थेत आहे. जलतरण तलावाच्या जलशुद्धीकरणाच्या कामाला सुरू होणार आहे. त्यानंतर १५ दिवसांत हा तलाव सर्वसामान्यांसाठी खुला होर्इल अशी माहिती क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोविडचे रुग्ण आढळत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील बहुतांश जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोविड नंतर काही दिवस जलतरण तलाव सुरु ठेवण्यात आला. त्यानंतर देखभाल दुरूस्ती व नूतनीकरणाचे निमित्त करत दीड वर्षांपासून हा तलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जलतरणपटूंना पोहण्यासाठी इतर तलावाचा शोध घ्यावा लागत आहे.
अनेक जण संभाजीनगर जलतरण तलावाला पोहण्यासाठी जात आहेत. यमुनानगर येथील तलाव पाण्याने पूर्ण भरला आहे. अद्याप तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे विचारणा देखील केली होती. मात्र उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
कुठलाही जलतरण तलाव आकस्मिकपणे बंद पडू नये, यासाठी त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. तलावाच्या जलशुद्धीकरणासाठी येत्या दोन दिवसांत निविदा उघडल्या जातील. त्यानंतर, जलशुद्धीकरणाच्या काम चालू होऊन तलाव येत्या १५ दिवसांत नागरिकांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली.