राजगुरूनगरात आमदार मोहिते पाटलांनी व्यक्त केली नाराजी
राजगुरूनगर – वरिष्ठ नेते ऐकत नाहीत आणि स्थानिक पातळीवर बरोबरच्या पक्षातील कार्यकर्ते कुरघोडी करतात. यामुळे महायुतीत सहभागी होऊन उपयोग झालेला नाही, अशी स्पष्ट नाराजी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
राजगुरूनगर येथील मुस्लीम दफनभूमी संरक्षक भिंतीच्या 55 लाख रुपये कामांचे भूमिपूजन आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राक्षे, मंगल चांभारे, शांताराम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,
महिला अध्यक्षा संध्या जाधव, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे पाटील, माजी सभापती विनायक घुमटकर, संचालक जयसिंग भोगाडे, अशोक राक्षे, मनीषा सांडभोर, मनीषा टाकळकर, आशा तांबे, सुभाष होले, सागर सातकर, मुस्लीम यंग फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष रफीक मोमीन, इम्रान मोमीन, मुस्लीम समाज अध्यक्ष समीर मोमीन, इजाज तांबोळी, फैज मोमीन, ओबीसी सेल खेड तालुका अध्यक्ष अॅड. इम्रान मोमीन, सादिक मोमीन, नौशाद तांबोळी, मोहसिन आतार, मोहजम मोमीन, अरबाज मोमीन, सलमान शेख, अकिब इनामदार, फैजल शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले; मात्र त्यांना कसलाच अनुभव नसल्याने आमच्या सारख्यांची अडचण झाली. माजी खासदारांचे ऐकून तालुक्याची प्रशासकीय इमारत माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अडकली. आता अनुभवी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. ते आम्हाला किंवा आमची विकास कामे, प्रस्तावांना लवकर मंजुरी देत नाहीत. तेही त्यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्याने ऐकतात. त्यांचे स्थानिक नेते, कार्यकर्ते पदावर नसताना निधी आणतात. आम्हाला डावलून भूमिपूजन, उदघाटने करतात. भविष्यात त्यांना आमची गरज पडेल तेव्हा पाहून घेऊ, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी तर रफिक मोमीन यांनी आभार मानले.
लोकसभेसाठी काम करायला…
केवळ आमच्या नेत्यांनी सांगितले म्हणून आम्ही सोबत आहोत; मात्र महायुतीत सहभागी झाल्याचा खेद वाटतो अशी उघड नाराजी दिलीप मोहिते पाटील यांनी केल्याने येणार्या लोकसभा निवडणुकीत ते व त्यांचे समर्थक महायुतीच्या उमेदवाराचे काम करायला धजावणार नाहीत, असे चित्र तालुक्यांत निर्माण झाले आहे.
काहींना निवडून येण्याचे डोहाळे
काहींना निवडून येण्याचे डोहाळे लागलेत; मात्र आमच्या शिवाय ते कसे पूर्ण होतात ? ते त्यावेळी पाहुन घेऊ असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता आमदार मोहिते पाटील यांनी दिला. विकास कामांना खो घालायला एक अतिशहाणा नेहमी पुढे असतो असे म्हणत भाजपाचे विधानसभा समन्वयक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्यावर त्यांनी टीका केली.
भीमानदीवर पायलट पूल बांधण्यात येणार
खेड तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे. तालुक्यात हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी 254 कोटींचा निधी आणला विकासाची गंगा आणली आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरूनगर शहरातील विकासकामांसाठी 200 कोटींचा निधी आणला. आगामी काळात शहरातील वाहतूक समस्या टाळण्यासाठी वडगाव पाटोळेते सातकरस्थळ असा भीमानदीवर पायलट पूल बांधण्यात येणार आहे.