तिरंगी लढतीत तटस्थांची भूमिका निर्णायक
पाबळ – येथील शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 21) मतदान होत आहे. यावेळी दोन वजनदार गट व तिसरा स्वतंत्र गट निवडणूक लढवत असून अत्यंत अटीतटीच्या लढाईत तटस्थ मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे; मात्र विजयी गटाला शाळेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
अध्यक्षीय पद्धतीने होत असलेल्या या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोनच पदासाठी मतदान होणार असून यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार असले तरी दोन गटातील उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.
या निवडणुकीत अध्यक्षीय पदासाठी पाबळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य सोपान जाधव व उद्योगपती तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव योगेश चौधरी व एकनाथ चापोडे या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे.
तर उपाध्यक्षपदासाठी प्रकाश बगाटे, कुमार तुकाराम बगाटे व दौलत उर्फ राज गायकवाड हे तीन उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यामध्ये योगेश चौधरी, कुमार बगाटे यांचे तसेच सोपान जाधव व प्रकाश बगाटे यांचे पॅनल असून चापोडे व राज गायकवाड स्वतंत्रपणे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
शिक्षण प्रसारक मंडळ पाबळची पद्ममणी जैन महाविद्यालय व श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून यामध्ये अडीच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.