पुणे – पुणे मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकने अनेक चढउतार पाहिले आहेत. गेल्या १२ वर्षांपासून बॅंक प्रगतीपथावर असून, बॅंकेने आर्थिक परिस्थिती उत्तम ठेवली आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. बॅंकेने असेच समाजाभिमुख कार्य करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सहकारी बँका खऱ्या अर्थाने पुणे शहराचीच नव्हे तर महाराष्ट्राची अर्थवाहिनी आहे, ही अर्थवाहिनी चांगल्या पद्धतीने सुरू राहावी, त्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुणे मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळा मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी बँकेच्या शतक महोत्सवी वर्ष पदार्पणाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार सुनील टिंगरे, दीपक मानकर, दत्तात्रय धनकवडे, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, अंकुश काकडे, रवींद्र रच्छा, हेमंत जगताप, योगीराज खिलारे, प्रसन्न जगताप, अजित खेसे, रावसाहेब खंडागळे, प्रदीप मिसाळ, उदय महाले, युवराज खेडकर राजन उडाणे, हेमा खात्री, प्रमिला कोंढरे आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची खरी प्रगती ही सहकार क्षेत्रामुळे झाली आहे. त्यामध्ये सहकारी बँकांचे मोठे योगदान आहे, परंतु सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे बँकांची बदनामी होते आणि त्यांचा परिणाम सर्व बँकांना भोगावा लागतो. त्यामुळे बॅंकेने पारदर्शी कारभार केले पाहिजेत. तरुण उद्योजक तयार करण्यासाठी सहकारी बँकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी तरुणांना सोयीस्कर पद्धतीने कर्ज वाटप केले पाहिजे.
स्मार्ट बॅंकिंगची गरज
विद्याधर अनास्कर म्हणाले, आज स्मार्ट बँकिंगचे जग आहे. पारंपरिक आणि स्मार्ट बँकिंगचा मेळ योग्य प्रकारे घातला, तर सहकारी बँका आधुनिक बँकिंग क्षेत्रामध्ये टिकू शकतील. पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने हे धोरण स्वीकारले आहे. संचालक मंडळामध्ये स्मार्ट बॅंकिंगसाठी दोन तरुण आयटी इंजिनिअर आणि तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी दोन जागा राखीव ठेवल्या पाहिजेत.
विजय ढेरे म्हणाले, बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे, अशावेळी स्मार्ट बँकिंग सुरू करण्यासाठी सरकारी क्षेत्राने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला परवानगी द्यावी. मुठभर लोकांनी केलेल्या चुकांचा परिणाम संपूर्ण सहकार खात्याला भोगावे लागतो. परंतु अशा काळातही पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवहार हे पारदर्शक आहेत आणि त्याबाबत रिझर्व बँकेने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कौतुक केले आहे, याच पद्धतीने वाटचाल करून पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अधिक प्रगती करू शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली. अंकुश काकडे यांनी आभार मानले.