Brisbane International Tennis Tournament 2024 | ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेद्वारे आगामी ऑस्ट्रेलियन ओएपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करण्याचे स्वप्न स्पेनचा मानांकित टेनिसपटू राफेल नदालने पाहीले होते. मात्र, ब्रिस्बेन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वी फेरीच्या लढतीत जॉर्डन थॉम्पसनकडून पराभव पत्करावा लागला.
मात्र, या सामन्यात त्याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याच्या कंबरेखालील भागाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला गेले संपूर्ण वर्ष टेनिसपासून दूर राहावे लागले होते. आताही त्याला पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा ही प्रत्येक मोसमातील पहिलीच ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असते. यंदा ही स्पर्धा येत्या 14 जानेवारीपासून मेलबर्न येथे सुरु होणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची रंगित तालिम मानल्या जात असलेल्या ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत एलेना रायबाकिनाने तर पुरुष एकेरीत ग्रीगोर दीमीत्रोव्ह यांनी विजेतेपद मिळवले. दीमीत्रोव्हचे हे गेल्या सहा वर्षातील पहिलेच मोठे विजेतेपद ठरले आहे.
महिलांच्या एकेरीत रायबाकिनाने अंतिम लढतीत आर्यना सबालेन्काचा ६-०, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. सबालेन्काला गेल्या सातपैकी पाच लढतींत रायबाकिनावर विजय मिळवण्यात यश आले होते. मात्र, यावेळी तीला परभवाचा सामना करावा लागला.
पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत दीमीत्रोव्हने अव्वल मानांकित होल्गर रुनचा ७-६, ६-४ असा पराभव केला व विजेतेपद मिळवले. हा सामना तब्बल २ तास १३ मिनिटे चालला. अत्यंत रंगतदार ठरलेल्या या लढतीद्वारे दीमीत्रोव्हीने गेल्या सहा वर्षांच्या अपयशाची मालिका खंडीत करताना मोठे विजेतेपद पटकावले. यापूर्वी त्याने २०१७ साली एटीपी स्पर्धा जिंकली होती.