ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकात दमदार सुरुवात करणारा न्यूझीलंडचा संघ आता खराब फॉर्मसोबतच दुखापतींनीही हैराण झाला आहे. किवी संघाने स्पर्धेतील पहिले चार सामने जिंकले होते. त्याने इंग्लंड, नेदरलँड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला होता. यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत. त्याला शनिवारी (4 नोव्हेंबर) पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. त्याआधी संघाला मोठा धक्का बसला होता. अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी (3 नोव्हेंबर) मॅट हेन्रीच्या बाहेर पडण्याची पुष्टी झाली. त्याच्या जागी काइल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे हेन्रीला स्पर्धेला मुकावे लागणार आहे. बुधवारी पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यादरम्यान 31 वर्षीय मॅट हेन्रीला दुखापत झाली होती आणि एमआरआय स्कॅन केले असता त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली असल्याचे स्पष्ट झालं आहे, ज्यातून बरे होण्यासाठी किमान दोन ते चार आठवडे लागतील. “मॅट हेन्रीला झालेली दुखापत आणि मोक्याच्या क्षणी त्याचे स्पर्धेतून बाहेर होणे यामुळे आम्ही निराश झालो आहोत,” असे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी बेंगळुरू येथे सांगितले.
गॅरी स्टीड म्हणाले, “मॅट हा आमच्या एकदिवसीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि स्पर्धेच्या अखेरीस त्याला बाहेर पडताना पाहणे खूप निराशाजनक आहे. गेल्या काही काळापासून तो सातत्याने आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 गोलंदाजांमध्ये आहे. त्याच्या जागी आता जेमीसन याचा संघात समावेश करण्यात येईल. ”
जेमीसन पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास सज्ज…
28 वर्षीय जेमीसन या खेळाडूच्या पाठीवर फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. टीम साऊदीला बॅकअप खेळाडू म्हणून बोलावल्यानंतर त्याने वर्ल्डकपदरम्यान न्यूझीलंडसोबत पूर्ण दोन आठवडे सराव केला असून पाकिस्तानविरुद्धच्या शनिवारच्या सामन्यासाठी जेमिसन तयार असल्याचे स्टेड यांनी सांगितले.