ICC Test Rankings, Indian Cricket Team : भारतीय संघाने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला. मात्र या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक विजयानंतरही टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम राहू शकली नाही. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं अव्वल स्थान पटकावलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं पहिला सामना गमावला होता तर दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारतीय संघ 117 रेटिंग आणि 3746 गुणांसह ICC क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया संघानं 118 रेटिंग आणि 3534 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
क्रमवारीत इंग्लंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग 115 आणि 4941 गुण आहेत. त्यानंतर रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग 109 आणि 2536 गुण आहेत. यानंतर न्यूझीलंड 95 रेटिंग आणि 2471 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
Australia are the new No.1 Test team in the ICC rankings.
The winner of the WTC 2021-23, has regained the No. 1 spot in the Men’s Test Rankings, ending India’s command at the top. pic.twitter.com/68p7ip6GCf
— CricTracker (@Cricketracker) January 5, 2024
पाकिस्तानची अवस्था मात्र वाईट…
कसोटी क्रमवारीत पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. पाक संघ 92 रेटिंग आणि 2304 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे पहिल्या दोन कसोटीत पराभव पत्करावा लागला आहे. सलग दोन कसोटी गमावल्यामुळे पाकिस्तानला क्रमवारीत चांगलाच फटका बसला आहे.
AUS vs PAK 3rd Test Day 3 Stumps : हेजलवूडची घातक गोलंदाजी; सिडनी कसोटीत पाकिस्तान बॅकफूटवर…
केपटाऊनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय…
केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 55 धावांवर ऑलआउट केले आणि त्यानंतर पहिल्या डावात 153 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 176 धावा केल्या आणि भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने 12 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.