सुचविलेल्या उपाययोजनांच्या प्रगतीचा घेतला आढावा
पुणे – पुणे-नगर रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध विभागाकडून केलेल्या पाहणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) सादर केला जाणार आहे. या अहवालामध्ये अपघात प्रवणक्षेत्र, ते रोखण्यासाठी कोणत्या उपयायोजना करणे आवश्यक आहे यासह अन्य महत्वाच्या बाबींचा यामध्ये उल्लेख असणार आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरटीओ, पीडब्लूडी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अधिकार्यांनी पाहणी करून प्राथमिक उपायोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार रंबलर बसविणे, बॅरकीटे, पंक्चर काढणे अशा प्राथमिक उपायोजना करण्यात आल्याचे दिसून आले. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी खराडी बायपास चौक ते शिरूरपर्यंत पाहणी केली. या पाहणीत सतत अपघात घडणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली.
कोरेगाव भीमा वळण, रांजणगाव मंदिरासममोरील चौक, रांजणगाव एमआयडीसी चौक, शिक्रापूर चौक, सणसवाडी चौक, रांजणगाव येथील चढाचा व वळण असलेला रस्ता, लोणीकंद पोलीस ठाण्याजवळील वळण, कोंढापुरी, कारेगाव, कोरेगाव भीमा येथे होणारे अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.
त्यामध्ये रांजणगाव मंदिरासमोरील चौकात भुयारी मार्गाबद्दल चर्चा झाली आहे. त्यामध्ये या पाहणीमध्ये पीएमआरड़ीएचा कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये पीएमआरडीएची उदासीनता दिसून आली.