बारामती तालुक्यातील गहू पिकाचा पेरा घटणार : हरभरा पिकाचा पेरा वाढणार
काऱ्हाटी – दरवर्षी रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी व मका पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करणारा बारामती तालुका यंदा मात्र, कमी पावसामुळे हरभरा आणि ज्वारी पेरणीकडे वळला आहे. यंदा सर्वाधिक हरभऱ्याची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बारामती तालुक्यात केवळ 25 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे.
बारामती तालुक्यात मागील वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वच जलसाठ्यात मोठी वाढ झाली होती. शेतकऱ्यांनी खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जवळपास 75 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी केली होती. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी गहू व मका पिकाला पसंती दिली.
सिंचनाची सोय पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यंदा तालुक्यात पाणीटंचाई आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल आणि संच सोय पाहून रब्बीची पेरणी करावी, यंदा केवळ 25 हजार हेक्टरवर हरभरा पेरणी होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकाप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, परंतु, यावर्षी पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झाला नाही.
सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. परिसरातील विहिरीत जेमतेमच पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधनच उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांनी तर पेरणी करण्याचा विचारच सोडून दिला आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत थोडेफार पाणी आहे. त्यांनी मागील पंधरा दिवसांनी रब्बीच्या पेरणीसाठी लगबग सुरु केली आहे. काही शेतकरी यंत्राच्या साह्याने पेरणी करीत आहेत. खरिपात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी उसनवारी करून पेरणी करू लागला आहे.
बारामतीत उसावर लोकरी मावा
मोरगाव – दिवसभर उष्णता तर रात्रीची थंडी पडत आहे. थंडी, उष्णता व ढगाळ वातावरणामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पिकांना रोग पडू लागलेला आहे. उसावर पांढरा लोकरी मावा असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. पश्चिम भागात अत्यल्प पावसामुळे यावर्षी नदी, नाले, ओढे, बंधारे, विहिरी, कूपनलिका कोरडे ठणठणीत आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकरी नगदी पिके काढत आहेत. शेती सिंचन पाण्याच्या वाढत्या संकटाबरोबरच शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. लोकरी मावा उसाच्या पानावरील रस शोषतो. कीडग्रस्त पानाच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला व पानावर पिवळसर ठिपके दिसतात. पाने कोरडी पडून वाळतात. त्यामुळे ऊस कमकुवत होतो. वाढ खुंटून उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते. उसावर पांढरा मावा असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
बारामती तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा – 6811 हेक्टर, ज्वारी – 18846 हेक्टर, गहू 984 हेक्टर, मका-3553 हेक्टरवर पेरणी केली आहेत.
– सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती.