पुणे – साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “गदिमा पुरस्कार या वर्षी प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री सानिया यांना देण्यात येणार आहे. “गदिमा प्रतिष्ठान’तर्फे तो जाहीर करण्यात येतो. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा “गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार यंदा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या पत्नी अपर्णा यांना दिला जाणार आहे.
अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय तीस वर्षांपासून दिला जाणारा “चैत्रबन पुरस्कार’ गीतकार, कवी वैभव जोशी यांना दिला जाणार आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. विद्याताई माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गेल्या काही वर्षापासून विद्या प्रज्ञा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार तरूण आणि नव्या उभारीच्या गायिका स्वरदा गोडबोले यांना जाहीर करण्यात आला आहे.
पाच हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिरात या सर्व पुरस्कारांचे उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल आणि गदिमांचे स्नेही राम नाईक यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गदिमांचे चिरंजीव आणि “गदिमा प्रतिष्ठान’चे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी लिहिलेले “गदिमा बाबूजी एक अद्वैत’ आणि “गदिमांची पंचवटी आणि आम्ही सात भावंडे’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमात स्व. सुधीर फडके यांचे चिरंजीव आणि गायक श्रीधर फडके यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमानंतर गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमांच्या गीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.