मंचर – पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहर परिसरात भरवस्तीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय, पाटीलवाडा परिसरात बिबट्याचा वावर गुरुवारी (दि. 19) पहाटे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील उसात, शेतात, आढळणरारा बिबट्या आता मंचर शहरात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंचरचे सहायक पोलीस निरीक्षक बाळाजी कांबळे व पारगावचे सहायक निरीक्षक लहु थाटे हे मंचर शहर परिसरात गुरुवारी पहाटेच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना मंचर पोलीस ठाणे ते उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावर त्यांना दूरवर रस्त्यावरून बिबट्या सदृश प्राणी पळत जाताना दिसला. त्याचवेळी त्या रस्त्यावरून समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वरास त्यांनी विचारले की तू बिबट्या पाहिला का? त्याने सांगितले की तो प्राणी बिबट्याच होता.
त्यावेळी बाळाजी कांबळे यांनी पाटील वाडा येथे राहणारे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आरोग्यदूत सुशांत थोरात यांना तुमच्या घराजवळ बिबट्या आला आहे. सावध राहा असे फोन करून सांगितले. त्यानंतर थोरात यांनी सकाळी त्यांचे चुलते रवींद्र थोरात यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सीसीटीव्हीमध्ये घरापाशी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे.
तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी शेवाळवाडी मंचर येथील पुणे-नाशिक महामार्गावर अरविंद वळसे पाटील यांच्या रामा ऑटोमोबाइल आणि मनोरंजन हॉटेल जवळील झाडीत बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. पूर्वी झाडाझुडपात, शेतात, ऊसात आढळणारा बिबट्या आता थेट मंचर शहरात शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी खानवस्ती येथील उद्योजक आदित्य थोरात आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.