भाविकांची घटस्थापनेची लगबग; विविध मंदिरांमध्येही देवींची साजशृंगारयुक्त पूजा…
सातारा – सालाबादप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा होतो. त्याचा प्रारंभ आज रविवारी सकाळी जिल्ह्यातील विविध देवी मंदिरात तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी उभारलेल्या मंडप स्थळी घटस्थापनेने झाला.
रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असल्यामुळे सकाळी लवकर भाविकांची घटस्थापनेसाठी धांदल उडाली होती. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील पंचपाळे हौदावरील दुर्गा माता मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीशैलपुत्री रूपातील तसेच विविध फुलांचा साज शृंगार केलेली दुर्गादेवीची पूजा बांधण्यात आली होती. सातारा शहरानजीकच्या नटराज मंदिरात श्री उमादेवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला.
यावेळी मंदिरात वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट आणि वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता नाम पठण करण्यात आले. सातारा शहरातील मंगळवार तळे परिसरातील श्री तुळजाभवानी माता मंदिरातही आज मोठ्या उत्साहात घटस्थापना झाली. पोवई नाका परिसरातील श्री फोडजाई उर्फ शितळादेवी माता, माची पेठेतील सप्तशृंगी वनी देवस्थान, पोलीस मुख्यालय नजीकच्या श्री तुळजाभवानी मंदिरात तसेच देवी चौकातील कासार समाजाच्या महाकाली मंदिरात, प्रतापगंज पेठेतील महाकाली मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला.
जिल्ह्यातील औंध येथील श्री यमाई मंदिर मूळपीठ तसेच गावातील राजवाड्यातील यमाई मंदिरातही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आता पुढील दहा दिवस मोठी गर्दी होणार आहे. त्यानिमित्त मंदिर प्रशासनाचे वतीने विविध कार्यक्रम तसेच नियोजनबद्ध दर्शन रांगा करण्यात येत आहेत. सज्जनगड येथील अंगाई मंदिर, श्री क्षेत्र देऊर येथील मुधाई देवी, साखरगड निवासिनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या राजघराण्याच्या प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला.
मांढरदेव येथील श्री काळूबाई मंदिरातही घटस्थापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सातारा शहरात नवरात्रोत्सवानिमित्त रास दांडिया तसेच गुजराती गरबा आणि सामुदायिक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या पुजेसाठी लागणारी विड्याची पाने, सप्तधान्ये, घटस्थापनेतील महत्त्वाची ठरणारी वावरी, विविध प्रकारची फुले, हार, वेण्या, तोरणे खरेदीसाठी मोती चौक तसेच पोवई नाका परिसरात सातारकरांची मोठी गर्दी झाली होती.
चिपळूण परिसरातून विक्रीसाठी आणलेली गुलाबी रंगाची कमळे 20 रुपये प्रति नगाने विक्री झाली. शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्यावतीने दोन दिवस अगोदरच देवीच्या मूर्तीचे मंडपात आगमन करण्यात आले होते. आज सकाळी राजपथावरील श्री भवानी नवरात्र मंडळाची दुर्गा देवीची मिरवणूक ढोल- ताशांच्या गजरात काढण्यात आली.
यावेळी मार्गावर काढण्यात आलेल्या विविध आकर्षक रांगोळ्या लक्षवेधक ठरल्या. नवरात्रीच्या काळात अनेक भक्त व्रत अर्थात उपवास ठेवत असल्यामुळे शहरातील भाजी मंडईतून बटाटे, रताळी, काकडी, लाल भोपळा आदी फळभाज्यांना विशेष मागणी होती. तसेच उपवासाचे, फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठीही अनेक स्टॉलवर गर्दी दिसून आली.
पुढील नऊ दिवस घरोघरी होणाऱ्या विशेष पुजा, सप्तशती पाठ, देवी स्तोत्रांचे पठण, आरती, मंत्र जागर, महाप्रसाद यांनी पुढील नऊ दिवस गजबजून जाणार आहेत. पुढील सोमवारी नवमी दिवशी नवरात्राचे उद्ध्यापण केले जाणार असून त्यानंतर मंगळवार, दि. 24 रोजी दसरा सण साजरा होणार आहे.