मुंबई – बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2’ हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर 2’ ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. मात्र एकीकडे हा आनंद असताना सनीचे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सनी देओल धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला आहे.
धर्मेंद्र यांचे वय 87 वर्ष असून त्यांच्या तब्येतीसंबंधित काही समस्या आहेत. त्यानुसार त्यांच्यावर 20 दिवस अमेरिकेत उपचार होणार आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमात धर्मेंद्र रणवीर सिंहच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. वयाच्या 87 व्या वर्षीही त्यांची अभिनय करण्याची शैली आणि ऊर्जा सर्वांनाच थक्क करणारी होती. या चित्रपटातील त्यांच्या एका सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेत्री शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटात किसिंग सीन दाखवण्यात आला होता. ज्याची अधिक चर्चा रंगली होती.