वाई -धोम खूनसत्रातील मुख्य आरोपी मास्टर माईंड संतोष पोळला जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी आज सातारा येथील विधी सेवा समिती यांच्यावतीने आरोपीचे वकील म्हणून ऍड. दिनेश धुमाळ यांची खास नेमणूक केली आहे.
धोम वाई खूनसत्रातील आरोपी तथाकथित डॉक्टर संतोष पोळचे वकील ऍड. हुडगीकर यांनी या कामातून वकीलपत्र काढून घेतल्याने यापुढे कामकाज चालविणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर संतोष पोळने या खटल्याचे मी स्वतः कामकाज चालणार असल्याचे न्यायालयात सांगितले. त्याला विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पाहिजे असल्यास उपलब्ध करून दिला जाईल असे न्यायालयाने सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार दिला. त्यानंतर त्याने न्यायालयाला लेखी दिले. तुमच्या माहितीतील दुसरा कोणताही वकील तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला दिला जाईल, असे न्यायालयाने पोळला सांगितले.
मात्र, त्याने यास नकार दिला होता. या खटल्यात यापूर्वी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे तिचा उलटतपास संतोष पोळ याने घेतला होता. त्याने तिला उलटसुलट प्रश्न विचारले होते. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न न होता वेळेचा अपव्यय होत असल्याचे सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यामुळे न्यायालयाने पोळला वकील नेमण्यासाठी आजची तारीख दिली होती. त्यानुसार आज ऍड. दिनेश धुमाळ, सहकारी ऍड. ऋषिकेश सकुंडे यांनी आज आरोपीचे कामकाज पहिले. आज केवळ आरोपीला विधी सेवा समिती मार्फत ऍड. दिनेश धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली. ऍड. दिनेश धुमाळ वाईतील नामांकित वकील असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक फौजदारी खटले लढविले आहेत. त्यामुळे या खटल्यात ऍड. उज्वल निकम व ऍड. दिनेश धुमाळ यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. सुनावणीची पुढील तारीख 2 सप्टेंबर आहे. यावेळी माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलटतपास घेण्यात येणार आहे.