पुणे – पुण्यातील कोथरूडमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांनी देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दहशतवाद्यांनी जगभरातील घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मोडसचा अभ्यास केला होता. त्या आधारे देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याची तयारी केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या कोठडीत पोलीस 11 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शनिवारी दिले. दरम्यान, अटक केलेल्यांचे शिक्षण कमी आहे. मात्र, ते तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय प्रगत असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात सांगितले.
याप्रकरणात अटक करण्यात आलेले दहशतवादी आसयिस आणि अलसुफा या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत, असे राज्य एटीएस न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी तपासासाठी दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे ऍड. विजय फरगडे यांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. यशपाल पुरोहित यांनी युक्तिवाद केला.
कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय 24) आणि मोहंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय 23 दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी 18 जुलै 2023 रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची पावडर, काडतूस, दहशतवादी संघटनांची पत्रके तसेच ड्रोनचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता.
दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 24, रा. कोंढवा) आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा खासगी कंपनीतील अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी (वय 24, मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली. दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्वाच्या शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कटात “आयसिस’शी संबंधित असलेला झुल्फिकार अली बडोदावाला सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. “आयसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळ्यात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याप्रकरणी “एनआयए’च्या पथकाने बडोदावाला याच्यासह पुण्यातील डॉ. अदनाल अली सरकार यांच्यासह चौघांना अटक केली होती.
आधारकार्ड देऊन संवेदनशील वस्तूंची खरेदी
देशात बंदी नसलेली मात्र निर्बंध असलेली काही रसायने, संवेदनशील पदार्थांची खरेदीदेखील दहशतवाद्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करताना आधार कार्ड देणे सक्तीचे असते. या दशहतवाद्यांनी आधारकार्ड दाखवून या वस्तू खरेदी केल्या आहेत.
काही नकाशे जप्त
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून देशभरातील काही ठिकाणचे काही नकाशे जप्त करण्यात आले आहे. शनिवारी यातील एक नकाशा न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यात देशभरातील, कुठल्या ठिकाणी, कुठल्या शहरात घातपात करण्याची तयारी करण्यात येत होती याची माहिती देण्यात आली होती.