नवी दिल्ली – सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलीस यासारख्या केंद्रीय पोलीस दलांत तब्बल 1,14,245 पदे रिक्त आहेत. 2023मध्ये सुमारे 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
गृह मंत्रालय आणि त्याच्या अखत्यारितील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये बीएसएफ, एबीएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आयआर आणि सीआयएसएफ आदींचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांसह केंद्रीय पोलीस दलांमध्ये सध्या सुमारे 1,14,245 पदे रिक्त आहेत, असे अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
या रिक्त पदांपैकी 3,075 गट “अ’, 15,861 गट “ब’ आणि 95,309 गट “क’मध्ये आहेत. त्यापैकी 16,356 पदे अनुसूचित जातीसाठी, 8,759 अनुसूचित जमातीसाठी, 21,974 इतर मागासवर्गीयांसाठी, 7,394 आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि 59,762 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
रिक्त पदांची भरती ही एक निरंतर प्रक्रिया आहे. जेव्हा रिक्त पदे निर्माण होतात, तेव्हा पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र दिले जाते. रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने गृह मंत्रालयातर्फे नियमितपणे भरतीच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. ही पदे कालबद्ध पद्धतीने भरली जातात, असे अजयकुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले.
658 जवानांची आत्महत्या
गेल्या पाच वर्षांत केंद्रीय पोलीस सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समधील पन्नास हजारांहून अधिक जवानांनी नोकरी सोडली किंवा निवृत्त झाले. याच कालावधीत निमलष्करी दलाच्या 658 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. निमलष्करी दलाबाबत नित्यानंद राय यांनी वर्षनिहाय आकडेवारी दिली.