ऍडिलेड (ओव्हल) – भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीत व्यस्त आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे अनेक खेळाडू बऱ्याच दिवसांपासून तयारी करत होते. दोन्ही संघांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्येही खेळत होते. अशा परिस्थितीत सात जूनपासून ओव्हलवर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले असून, त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, भारतीय फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला भारतीय संघात संधी देण्याची जोरदार चर्चा आहे. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर आश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळावी, असे काही दिग्गजांचे मत आहे. त्याचवेळी आश्विनसारख्या गोलंदाजाला खेळपट्टीच्या मदतीची गरज नसते, तो कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांना त्रास देऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आश्विनची आकडेवारीही याची पुष्टी करते.
विचंद्रन आश्विनची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने कांगारूंविरुद्ध 22 सामन्यांत 114 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने बॅटने 543 धावा केल्या आहेत, ज्यात 62 (सर्वोच्च) धावांच्या खेळीचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच बळी घेण्याचा पराक्रम त्याने सात वेळा केला आहे.
सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट असलेल्या फलंदाजांविरुद्ध आश्विनचा विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला 11 वेळा बाद केले असून त्याला केवळ 194 धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर आश्विनने उस्मान ख्वाजाविरुद्ध 99 धावा दिल्या असून चार वेळा त्याची विकेट घेतली आहे. त्याने स्टीव्ह स्मिथला आठ वेळा बाद केले आहे, तर ऍलेक्स केरीविरुद्ध त्याने केवळ 25 धावा दिल्या आहेत आणि पाच वेळा त्याला बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात फक्त मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हेच फलंदाज आहेत, ज्यांची सरासरी आश्विनविरुद्ध 50 पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, ट्रॅव्हिस हेडची सरासरी 41.7 आणि कॅमेरॉन ग्रीनची सरासरी 38 आहे. ऍलेक्स कॅरी आश्विनविरुद्ध अवघ्या पाच धावा करून बाद झाला होता.
उत्कृष्ट गोलंदाज असण्यासोबतच आश्विन आणि जडेजा हे दोघेही फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. खालच्या फळीत निर्णायक भागीदारी उभारण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत दोघांचीही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्तम आहे. फिरकी गोलंदाज असल्याने हे दोघेही लांब स्पेल टाकू शकतात. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टोकाकडून वेगवान गोलंदाजांचा वापर करू शकतो.
इंग्लिश मातीतही आश्विन प्रभावीच…
इंग्लिश मातीतही रविचंद्रन आश्विनचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने येथे सात कसोटीत 18 विकेट्स घेतल्या असून 261 धावा केल्या आहेत. नाबाद 46 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आश्विनविरुद्ध फक्त ट्रॅव्हिस हेडची सरासरी 25 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत आश्विन भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. इंग्लंडमधील ओव्हलवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.
अशा स्थितीत दोन्ही संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतात. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे भारतीय संघात खेळतील याची खात्री आहे. चौथ्या वेगवान गोलंदाजाला संधी मिळाल्यास शार्दूल ठाकूर किंवा जयदेव उनाडकट खेळू शकतात. भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली तरच आश्विन आणि जडेजा हे दोघेही संघात असतील.