लंडन -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी जो संघ निवडला होता, तोच संघ कायम ठेवण्यात आला आहे. ऍशेस मालिकेला 16 जूनपासून एजबॅस्टन येथे सुरुवात होणार आहे.
आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जोश टोंगची केवळ एक कसोटी खेळल्यानंतर ऍशेस संघातही निवड झाली. लॉर्डसवर पहिल्या डावात जोश टोंगने पाच विकेट घेतल्या होत्या. जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांच्या दुखापतींसाठी त्याला बॅकअप म्हणून घेण्यात आले होते. योगायोगाने त्याला त्या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात आठ वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. अनुभवी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याशिवाय मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वुड आणि जोश टोंग यांची निवड करण्यात आली आहे.
जॅक लीच हा संघातील एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहे. त्याचबरोबर एसेक्सच्या डॅन लॉरेन्सला अतिरिक्त फलंदाज म्हणून ठेवण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडला आपला कर्णधार बेन स्टोक्सच्या फिटनेसची सर्वाधिक चिंता आहे.
पहिल्या दोन ऍशेससाठी संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड