नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिलिकॉन व्हॅलीस्थित स्टार्टअप उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भारत सरकारवर निशाणा साधला.
पेगासस आणि अशा इतर तंत्रज्ञानाच्या मुद्द्याबद्दल बोलताना राहुल म्हणाले की, ‘मला माहित आहे की माझा फोन टॅप केला जात आहे. मात्र याचा मला त्रास होत नाही. यादरम्यान राहुल गांधी यांनी त्याचा फोन काढला आणि गमतीने म्हटले, हॅलो…! मिस्टर मोदी”.
राहुल गांधी पुढे म्हणाले, मला वाटते की, माझा आयफोन टॅप केला जात आहे. एक राष्ट्र म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तुम्हाला डेटाच्या संरक्षणासाठी योग्य नियमांची आवश्यकता आहे. जर कोणत्याही देशाला तुमचा फोन टॅप करायचा असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. ही माझी समजूत आहे. देशाला फोन टॅपिंगमध्ये स्वारस्य असेल, तर ती लढाई लढण्यासारखी नाही. मला वाटते की मी जे काही काम करतो ते सर्व सरकारसमोर आहे.”
राहुल सनीवेलमधील ‘प्लग अँड प्ले टेक सेंटर’मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदाही उपस्थित होते. भारतातील दुर्गम खेड्यातील लोकांशी तंत्रज्ञान जोडणे आणि त्याचे परिणाम यावरही राहुल गांधी यांनी आपले मत मांडले.