आतापर्यंतचा मोठा ड्रोन हल्ला, 54 पैकी 52 ड्रोन पाडली
किव्ह : रशियाने आज युक्रेनची राजधानी किव्हवर मोठा ड्रोन हल्ला केला. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यापासून आतापर्यंत इतका मोठा ड्रोन हल्ले युक्रेनवर करण्यात आला नव्हता. युक्रेनची राजधानी किव्हचा स्थापना दिन रविवारी साजरा होत असताना हा हल्ला झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी रात्रीच्या वेळेस हा ड्रोन हल्ला झाला. त्यामध्ये रशियाने इराणी बनावटीच्या शाहेद या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, असे किव्हमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी सेरही पोपको यांनी सांगितले. हा हल्ला तब्बल 5 तास सुरू होता. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तब्बल 40 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामध्ये 41 वर्षीय एक पुरुष ठार झाला आणि 35 वर्षीय महिला जखमी झाली. ड्रोनमुळे 7 मजली इमारतीचा काही भाग या महिलेच्या अंगावर कोसळला. या ड्रोनमुळे इमारतीला आग देखील लागली, असे किव्हच्या महापौरांनी सांगितले.
शनिवारी रात्री देखील रशियाच्या ड्रोनचा मारा संपूर्ण देशभर अनेक ठिकाणी झाला होता, असे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले. रशियाने डागलेल्या 54 ड्रोनपैकी 52 ड्रोन युक्रेनच्या हवाई दलाने पाडली.
ईशान्येकडील खारकीव्ह प्रांतात एक ज्येष्ठ महिला आणि एका ज्येष्ठ पुरुषाचा मृत्यू या ड्रोन हल्ल्यामुळे झाल्याचे या प्रांताचे गव्हर्नर ओलेह सिनेहबोव यांनी सांगितले. मे महिन्याच्या प्रारंभी देखील रशियाने किव्ह शहरावर मोठा ड्रोन हल्ला केला होता. रशियाने किन्झाय क्षेपणास्त्रांचा मारा देखील किव्ह शहरावर केला होता. ही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच पाडली गेली होती.
किव्ह शहराचा स्थापना दिवस
युक्रेनची राजधानी किव्हच्या स्थापनेनिमित्त “28 मे रोजी देशभर “किव्ह डे’ साजरा केला जात असतो. या दिवशी संपूर्ण शहरात जत्रेचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. रोषणाई आणि प्रदर्शनेही लावली जात असतात. किव्ह शहराच्या 1,541 व्या वर्धापनदिनानिमित्त यंदा होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरुप साधे राहणार होते. रशियाकडून झालेल्या ड्रोन हल्ला एक योगायोग नव्हता, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. “किव्ह डे’च्या निमित्ताने रशियाने ड्रोन हल्ल्याच्या स्वरुपात किव्हला शुभेच्छा दिल्या आहेत, असे किव्हच्या महापौरांनी म्हटले आहे.