मुंबई – भारतीय कुस्तीपटू कविता देवी ही ‘डब्लू डब्लू इ’मध्ये आपले कर्तब दाखवणारी पहिली महिला भारतीय रेसलर आहे. डब्लू डब्लू इ च्या रेसलिंगमध्ये पाऊल ठेवून कविता देवी यांनी भारतीय महिला कोणत्याही बाबतीत कमी नसल्याचे दाखवून दिले. याच धाडसी कविता देवीचा जीवनप्रवास आता त्यांच्या बायोपिकमधून उलगडणार आहे.
निर्मात्या प्रीती अग्रवाल यांनी कविता देवी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे हक्क विकत घेतले असून मोठ्या स्केलवर या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असलयाचे समजते. 36 वर्षीय कविता देवी आणि भारतीय रेसलर म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या द ग्रेट खलीचेही खास नाते होते. खलीनेच कविता देवी यांना रेसलिंगसाठी प्रशिक्षण दिले. कविता देवी डब्लूडब्लूईमध्ये येण्यापूर्वी हार्ड केडी या नावाने स्वतंत्रपणे कुस्ती करत होत्या.
या चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना प्रीती अग्रवाल म्हणाल्या, ‘कविता देवी यांचे संपूर्ण आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी लढण्याची वृत्ती दाखवली आणि जीवनात कधीही हार मानली नाही. एकेकाळी डब्लूडब्लूइ फक्त पुरुषांसाठी असल्याचे समजले जायचे. मात्र कविताने फक्त आपलीच नाही तर संपूर्ण देशाची ताकद जगासमोर दाखवून दिली.” म्हणून त्यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट बनवणार असल्याचे प्रीती अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
इरफान खान स्टारर हिट चित्रपट ‘द सॉंग ऑफ स्कॉर्पियन्स’चे निर्माते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘मैं अटल हूं’चे सह-निर्माते झीशान अहमद, कविता देवी यांच्या बायोपिकची निर्मिती करण्यास उत्सुक असल्याचे देखील समजते. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही त्यामुळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता सर्वांना लागलीय आहे.