मुंबई : भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात दुसरा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात कोसळण्याची शक्यता या अंदाजात वर्तवण्यात आली आहे. देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाची म्हटले आहे. हवामान विभागाकडून तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटा कमी आल्या. सध्या नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारजवळ आहेत. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकुल स्थिती असल्याने मोसमी वारे ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतील असे सांगण्यात आले आहे.