त्रिभूज शेळके
पारगाव – दौंड तालुक्याचे राजकारण अनेक वर्षांपासून आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोन घराण्याभोवती फिरत आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत कुल यांचा 746 मतांनी अगदी निसटता विजय झाला होता. त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव काम केल्याची पोचपावती त्यांना त्यावेळी मिळाली होती. दर रविवारी कुल यांचा जनता दरबार हा त्यांची मतांची बेरीज वाढविणारा ठरत आहे. याची प्रचिती ही बाजार समितीच्या निवडणुकीतून पाहावयास मिळाली आहे. आगामी निवडणुकीत कुल यांच्यासाठी जनता दरबार हा मतपेढी ठरणार आहे.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या टप्प्यात कुल यांनी पोस्ट मतातून विजय खेचून आणला होता. आरोग्यासाठी केलेल्या अति महत्वाच्या कामाची पावती त्यांना या रूपाने मिळाली होती. आमदार कुल यांचा प्रत्येक रविवारी राहू येथील निवासस्थानी जनता दरबार भरतो. याला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत आहे.
दौंड तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातून शेकडो नागरिक कामे घेऊन या ठिकाणी येतात. आमदार कुल यांच्या निवासस्थानासमोर भरगच्च गर्दी असते. येणाऱ्या सर्वांची आमदार भेट घेत त्यांची प्रस्तावित कामे पत्र देऊन किंवा लगेच फोन लावून मार्गी लावतात. ते स्वतः वकील असल्याने किचकट कामांनाही ते का होणार नाही, हे जागेवरच सांगतात. तसेच काही वेळी नागरिकांना पटवून देतात. त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटते.
राहूल कुल समर्थकांचा गट मजबूत होतोय
दहा वर्षांच्या कालावधीत आमदार राहुल कुल यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा तालुक्यात आणली आहे. मागील पाच वर्षांतील कामे आणि या पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखा केल्यास कुल यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरत आहे. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी ग्रामपंचायत आणि सोसायटीवर मोठ्या प्रमाणात सत्ता काबीज केली. याचा लाभ हा त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत झाला आहे. बाजार समितीवर एकहाती असलेल्या थोरात गटाला ही धोक्याची घंटा आहे. यातून राष्ट्रवादीने आत्मचिंतन केले तरच येत्या विधानसभा निवडणुकीत कुल यांना टक्कर देऊ शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.