कोलकाता – कोलकाता नाईट रायडर्सने कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) टी-20 स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी मुळच्या वेस्ट इंडिजच्याच फिल सिमन्स यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात सध्या सुरु असलेली आयपीएल स्पर्धा संपल्यावर तीन महिन्यांनी सीपीएलला प्रारंभ होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे सीपीएलमधील त्रिनबॅगो संघाची मालकी असून या संघाचे त्या स्पर्धेतील नाव त्रिनबागो नाइट रायडर्स असे आहे.
कोलकाताने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फिल सिमन्स यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक नायर हे मुंबईकर क्रिकेटपटू सध्या या संघाशी जोडले गेले होते. त्यांची जागा आता सिमन्स घेतील. कॅरन पोलार्ड त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार आहे.
सिमन्स एक प्रशिक्षक म्हणून खूप नावाजले गेले आहेत. ते दोन वेळा वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक होते. तसेच त्यांनी झिम्बाब्वे, आयर्लंड व अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी काम केले आहे. सीपीएल लीग येत्या 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 24 सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून त्रिनबागो नाइट रायडर्सचे नाव घेतले जाते. त्यांनी या स्पर्धेचे विक्रमी 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे.