मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन अचानक निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी काल दिली होती. त्यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही सुरु आहे.
लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहसह राज्यभरातून त्यांच्या निवृत्त होण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्याचा सूर निघत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडूनही सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
शरद पवारांनी पद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन चार नावं प्रामुख्याने घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवादही चांगला आहे.