वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या मारामारीमुळे गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पैसे वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ६) काहीजणांना पकडले होते. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर हा प्रकार घडला होता. त्यातून झालेल्या मारामारीमुळे काहीजणांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून काहीजण मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती गावातील कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर या कार्यकत्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटप होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करताना दोन्ही गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिकांनी ही माहिती वाठार स्टेशन पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती परिसरात पसरली. मतदानाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावात भेट दिली.
मंगळवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
या पार्श्वभूमीवर गावात गेले दोन दिवस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. दुपारी वाठार पोलीस व एसआरपीफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काल (बुधवार) भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी तर शुक्रवारी सायंकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून घटनेबाबत माहिती घेतली.