मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांची घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील दांडी मारत असल्याचं चर्चा मध्यंतरी सुरु होत्या.
मात्र, काल (दि. 23) त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती, जी पाहून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. या पोस्टमुळे अमोल कोल्हेंचा आता राष्ट्रवादीकडून भाजपाकडे तर प्रवास सुरु झाला नाहीय ना.? असा अंदाज वर्तवला जात होता. अमोल कोल्हेंच्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
काल (दि. 23) सगळीकडे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला होता. या दिनानिमित्त सर्वच जण पुस्तकांचं वाचन करण्याची प्रेरणा देत होते. अश्यातच अमोल कोल्हे यांनीसुद्धा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पण या फोटोमुळे भलतीच चर्चा सुरु झाली.
शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी दोन फोटोंचा एक कोलाज बनवलेला आहे. या फोटोमधील पहिल्या फोटोमध्ये अमोल कोल्हे शरद पवार यांचं ‘नेमकेच बोलणे…’ हे पुस्तक अभ्यासात असताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक वाचत आहेत. या फोटोसोबत ‘विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?’ असे कॅप्शनही अमोल कोल्हे यांनी या पोस्टला दिलं होत.
विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?#WorldBookDay #WorldBookDay2023 pic.twitter.com/o9EXHoPLcf
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 23, 2023
आता या दुसऱ्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या. अमोल कोल्हे पुस्तकाच्या माध्यमातून बीजेपीबाबत काही हिंट तर देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना.? असा संशय सर्वांना येत आहे. दरम्यान, आता स्वतः अमोल कोल्हे यांनीच या चर्चांवर स्पष्टीकरण दिल्याचं दिसून आलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान अमोल कोल्हे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, ‘दोन पुस्तकं वाचत असताना मी फोटो टाकले. मी इस्लामपूरमध्ये येताना अनेकांचे मला फोन आले. एक पुस्तक होतं शरद पवारांच्या भाषणांचं ‘नेमकेचि बोलणे’. दुसरं पुस्तक होतं नलिन मेहतांचं ‘द न्यू बीजेपी’. बातम्या लगेच सुरू झाल्या की नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की विचारधारा कोणतीही असली, तिचा विरोध जरी करायचा असला तरी तिचा आधी अभ्यास करायला लागतो हे जास्त महत्त्वांच आहे. ते तुमच्या वाचनातून येतं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.