नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी “सुपर चोर’ बंटी उर्फ देवेंद्रला अटक केली आहे. दिल्लीच्या दक्षिण जिल्हा पोलिसांनी बंटीचा 500 किमी अंतरावर असलेल्या कानपूरपर्यंत पाठलाग करून त्याला अटक केली. अलीकडेच ग्रेटर कैलासमधील दोन घरांमध्ये चोरी झाली होती, ज्यामध्ये बंटीचे नाव समोर आले होते. विशेष गोष्ट म्हणजे बंटीवर यापूर्वी, एक चित्रपटही बनला आहे. तो यापूर्वी सलामान खान होस्ट असलेला विवादित शो बिग बॉसमध्येही झळकला होता.
देवेंद्र सिंह उर्फ “बंटी चोर’ उर्फ “सुपर चोर’ याच्यावर देशभरात 500 हून अधिक चोरी केल्याचा आरोप आहे. त्याला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षाही झाली आहे. 2010 मध्ये, जेव्हा बंटी 3 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने आता आपण चोऱ्यामाऱ्या सोडून सुधारणार असल्याचे वचन दिले होते. त्याच्या वचनानंतर तो बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. मात्र वर्षभरानंतर तो पुन्हा एका चोरीच्या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला. यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे “ये बंटी नहीं सुधरेगा’ असेच म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली.
पुण्यातून झाली होती अटक
आता केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये एका अनिवासी भारतीय व्यावसायिकाच्या घरात चोरी केल्याप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे. ही चोरी 2013 मध्ये झाली होती. बंटीने व्यावसायिकाच्या घरातून 28 लाख रुपये किमतीची एसयूव्ही कार, लॅपटॉप आणि दोन मोबाइल चोरले होते. या हायटेक चोरीच्या 6 दिवसानंतर केरळ पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली होती. बंटी “सुपर चोर’ एका खास पॅटर्नमधून चोरी करतो. त्यावर “ओये लकी ओये’ हा चित्रपटही बनवण्यात आला आहे. या चित्रपटात बंटीची भूमिका अभिनेता अभय देओलने साकारली होती.