पिंपरी – शिवसेनेचे नाव, चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाचा हा निर्णय सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय तडकाफडकी का दिला याचा विचार करण्याची गरज आहे. आता ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नाही. तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची, लोकशाहीच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे जनतेने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मुस्कटदाबीला जनता मतदानाद्वारे चोख उत्तर देईल. तसेच शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी शिवसैनिकांनी बाहेर पडून महाविकास आघाडीला मतदान करावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचाराची सांगता शुक्रवार (दि. 24) झाली. चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, प्रकाश गजभिये, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, योगेश बहल उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, भाजप सोईचे राजकारण बघते. जिथे जे साध्य करण्याचा प्रयत्न करता येईल ते करतात. पण, निवडणूक सोपी नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामाचा शास्तीकर माफीचा आचारसंहिता संपल्यानंतर आदेश काढला जाईल, असे फडणवीसांनी आश्वासन दिले. मात्र, फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यावेळी शास्तीकराचा प्रश्न का सोडविला नाही. पाणी, सोसायटीचे प्रश्न आहेत. सरकार असताना प्रश्न सोडवित नाहीत. निवडणूक आल्यानंतर केवळ आश्वासने दिली जातात. एक आणि दोन नंबरचे नेते आमच्या लोकांना फोन करत असल्याचाही गौप्यस्फोट पवार यांनी केला.
पोटनिवडणुकीत प्रथमच मुख्यमंत्र्यांचा “रोड शो’
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या. कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड-शोच्या निमित्ताने फिरत नव्हते. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फिरले हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण मांडून आहेत. काही मंत्री गुंडांना घेवून फिरत आहेत. निवडणूक एकतर्फी असून बिनविरोध द्या असे भाजपवाले म्हणत होते. परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर मंत्र्यांनी ठाण मांडले आहे. यावरुनच निवडणूक एकतर्फी राहिली नसून चुरशीची झाल्याचे स्पष्ट दिसते.