थेऊर -मोबाइलच्या अतिवापराने ग्रामीण भागातील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाइल गेम्सच्या खेळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. या खेळाने मुलांच्या डोक्यावर परिणाम झाल्यागत वागू लागली आहेत. हल्ली इंटरनेट, ऑनलाइनचा जमाना आहे. सध्या लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाइल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, याच्या अतिरिक्त वापराने तरुणाई बिघडत चाचली आहे. अशातच भर पडली ती, ऑनलाइन गेमची. शॉर्टकट पैसे कमाविण्याच्या नादात अक्षरशः तरुणांचा बळी जातोय, हे त्यांच्या लवकर लक्षातही येत नाही.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोलवडी, नायगाव, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसर अर्थसंपन्न असून या 10 ते 12 वर्षांत पूर्व हवेलीसह संपूर्ण तालुक्याचा कायापालट झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन कोणत्याही गोष्टी या घरापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. रम्मीसारखे गेम्स सुरुवातीला कुतूहल म्हणून खेळायला सुरू करणारे तरुण हळूहळू त्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
ऑनलाइन गेमच्या माध्यमातून “काही तासातच लाखो रुपये कमवा करोडपती व्हा’ अशी आमिषे दाखविणाऱ्या जाहिराती दिवसभरात सतत पाहायला मिळत आहेत. तरुणाई याकडे ओढली जात आहे. यातून आर्थिक लाभ होण्याचे तर दूरच, पण ती मुले घरातील आर्थिक गणितेसुद्धा बिघडवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
या आहेत गेम्स
तीन पत्ती, क्लासिक रमी, जंगली रमी, ताज रमी, रमी सर्कल, इंडिगो रमी, रमी फाषण, रमी व्हिला, डेक्कन रमी, खेळ प्ले रमी, येस2थ्री रमी, रमी सर्कल आदी अनेक प्रकारच्या रमी उपलब्ध आहेत.
ऑनलाइन जुगार तरुणांना पोखरू लागला
मोबाइल, लॅपटॉप, संगणकावर जुगार खेळण्याचे सॉफ्टवेअर, इंस्टॉल करून जुगार खेळले जात आहेत. पैशाची देवाण-घेवाण ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. हा ऑनलाइन जुगार तरुणांना पोखरू लागला आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. वेळीच लक्ष दिले नाहीत तर मोठ्या हानीला पालकांना सामोरे जावे लगणार आहे.