श्रीगोंदा – मृत फिर्यादी गोरख मारुती भदे व त्यांची पत्नी सुरेखा गोरख भदे या सख्ख्या भावास व भावजयीला जिवंत जाळून मारल्याच्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी आरोपी शरद मारुती भदे व रंजना शरद भदे (दोघे रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अन्य सहा आरोपींविरुद्ध सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या घटनेची अधिक माहिती अशी की, गोरख मारुती भदे व त्यांचा सख्खा भाऊ शरद मारुती भदे यांचा वडिलोपार्जित शेतजमीन कसण्यावरून वाद होता. त्या वादाचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दि. 28 ऑगस्ट 2019 रोजी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे त्यांच्या शेडगाव येथील छपरात झोपलेले असताना आरोपी शरद भदे व इतर आरोपींनी पहाटे पाचच्या सुमारास संगनमताने पेट्रोल टाकून छप्पर पेटवून दिले. त्यात भदे पती-पत्नी भाजू लागल्याने छपराचा दरवाजा उघडून बाहेर पडले असता त्यांना आरोपींनी जबर मारहाण केली. या प्रकरणी जखमींच्या जबाबानुसार शरद भदे व सात जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील फिर्यादी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी गुन्ह्याचा तपास करून आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी, तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संगीता ढगे यांनी काम पाहिले. सरकारी वकिल मंगेश दिवाण यांनी 21 साक्षीदारांपैकी 2 साक्षीदारांची साक्ष तपासली. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील संगीता ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी एस. एस. फलके, आशा खामकर, डी. के. भंडालकर यांनी सहकार्य केले.