श्रीगोंदा – येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि. 22) दुपारी तीनच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागातील एक विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरातील एका खासगी वसतिगृहात राहत होती.
ही विद्यार्थिनी आज दुपारी महाविद्यालयातून आल्यानंतर वसतिगृहात पोहोचली. परंतु तिने चार वाजले तरी खोलीचा दरवाजा न उघडल्याने ही गोष्ट अन्य विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या कानावर घातली. त्यानंतर पोलिसांना बोलावून खोलीचा दरवाजा उघडला असता या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, तिने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असण्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.