पुणे – ‘शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल इतिहास लोकांपर्यंत पोहोचवून महान कार्य केले आहे.’ असं विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आंबेगाव येथे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे चित्रण करणाऱ्या शिवसृष्टी पार्कच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, ‘पुरंदरे यांचे शिवाजी महाराजांवरील संशोधन अनन्यसाधारण आहे कारण त्यांनी थोर मराठा योद्ध्यांच्या खऱ्या इतिहासाशी संबंधित तथ्ये आणि पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 50 वर्षे यासाठी घालवली होती.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गुणगौरव केल्यानंतर आता राज्यातील राजकारण आणखी तापल्याचं दिसून येत आहे. आणि त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिठकरी यांनी अमित शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गुणगौरव केला असला तरी त्यांनी वाचलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती. अमित शाह तुम्ही गुजरातचे आहात तर गुजरातमध्ये राहा महाराष्ट्रच्या इतिहासमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका.’ असं विधान त्यांनी केला आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या विधानामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.