मंचर – मंचर येथील जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर दुतर्फा अनधिकृत उभ्या राहणाऱ्या मालवाहू अवजड वाहनावर मंचर पोलीस आणि नगर पंचायतीने संयुक्तपणे कारवाई करावी, या मागणीसाठी मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे भाजप महिला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मंचर येथील जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर महात्मा गांधी विद्यालयाचज्ञ तसेच अण्णासाहेब आवटे कॉलेजचे विद्यार्थी येतात. त्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांचे अपघात झाले आहेत. अपघात थांबवण्याकरता यापूर्वी मंचर पोलीस ठाण्याला अर्ज देण्यात आला होता. एक-दोन वेळा मंचर पोलीस ठाण्याने कारवाई केली; परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाहने लावली जात आहेत.
नगरपंचायतीने हा विषय गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी “नो पार्किंग’चा बोर्ड लावावा. जेणेकरून तिथे अनधिकृत पार्क केल्या जाणाऱ्या अवजड वाहनांवर पोलीस ठाण्याला कारवाई करता येईल. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या मंचर शहराध्यक्ष जागृती महाजन, संघटन सरचिटणीस छाया थोरात,
सरचिटणीस पल्लवी थोरात, शहर उपाध्यक्ष निर्मला भालेराव, पूजा हुले, सदस्य अंजली जंगम, शिल्पा बनबेरू आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.