पिंपरी – फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम दि.26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मेट्रोचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मेट्रोचे प्रत्यक्ष प्रवास करता येणार येईल, असेही पाटील यांनी सांगितले होते. परंतु मेट्रोने प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही हुकवत आपली तारीख पे तारीखची परंपरा कायम ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होऊन जवळपास वर्ष होत आले आहे. परंतु ज्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन झाले आहे तेथील काम देखील अद्याप अपूर्णच आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समूहात समावेश होतो. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या दोन दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दशकांत पिंपरी-चिंचवड परिसरात शहरीकरणात वेगाने वाढ होत आहे. वाढती लोकसंख्या पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे खूप गरजेचे आहे. यामध्ये मेट्रो महत्त्वाचा पर्याय ठरू शकेल, असे वाटत होते. परंतु मेट्रोच्या कामाचा वेग पाहता नागरिकांच्या पदरी मात्र निराशाच येताना दिसत आहे.
पिंपरी-चिंचवडचा विचार केल्यास सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा असा अगदी लहानसा मेट्रोचा प्रवास सुरू आहे. या मार्गावर नागरिक मेट्रोमध्ये केवळ “जॉय राइड’ म्हणून बसत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण स्पष्ट आहे की एकतर अंतर खूपच कमी आहे आणि दुसरे म्हणजे ज्या मार्गावर मेट्रो धावत आहे त्याच रस्त्यावर पीएमपीएमएलच्या बहुतेक बस, रिक्षा देखील धावत आहेत. तसेच शेजारीच रेल्वे लाइन असल्यामुळे लोकल देखील याच मार्गावर धावत आहे. जिथे आधीपासूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सर्व सुविधा उपस्थित आहेत, त्याच मार्गावर मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
आचारसंहितेची ढाल
मेट्रोच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्ताबाबत मेट्रोच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आचारसंहितेची ढाल बनवत त्यांनी यायाबत अधिक बोलणे टाळले. मात्र, चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीदेखील अपेक्षित कामे वेळेत पूर्ण झाली नसल्याचे वास्तव आहे. मात्र, आता आचारसंहिता या अधिकाऱ्यांना आयते कोलित सापडले आहे.
मेट्रोकडून “तारीख पे तारीख’
लवकरच मेट्रो पूर्ण क्षमतेने धावेल अशी आश्वासने आणि घोषणा राजकीय नेते आणि मेट्रोच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन नवी तारीख देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पीसीएमसीपासून रेंजहिल पर्यंत मेट्रो सुरू करण्याची टार्गेट डिसेंबर 2019 ठरविण्यात आले होते. ते पूर्ण करण्यास 2022 वर्ष उजाडले. तर रेंजहिल ते स्वारगेट नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हे सर्व दावे आणि तारखा हवेत विरल्या आहेत.