पिंपरी, दि. 21 – कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे चाकण येथे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील हजारो कमागारांना विविध कारणांसाठी महामंडळाच्या भोसरी येथील कार्यालयात येण्याचा फेरा वाचणार आहे. त्यामुळे वेळेची व पैशाचा अपव्ययदेखील थांबला आहे.
ईएसआयसीने ऑगस्ट-2016 पासून चाकण क्षेत्रासाठी ईएसआयसीची व्याप्ती लागू केली आहे. या परिसरातील शेकडो उद्योगांमधील हजारो कामगार या योजनेचे लाभार्थी आहेत. परंतु आजपर्यंत चाकण येथे शाखा कार्यालय नव्हते. हे कामगार आणि कंपनी प्रतिनिधींना खूप गैरसोयीचे होते. वैद्यकीय हक्क किंवा इतर समस्यांशी संबंधित कोणत्याही कामासाठी त्यांना भोसरी शाखेला भेट द्यावी लागे. कामगारांना होणारा त्रास पाहून फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सतत प्रयत्न करून ईएसआयसी कॉर्पोरेशनच्या बिबावेवाडी कार्यालय, दिल्ली, मुंबईचे मुख्य कार्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा करून चाकणला इएसआयसीचे कार्यालय मंजूर करून आणले.
या कार्यालयाचे उद्घाटन फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हालन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला ईएसआयसी दिल्लीचे मुख्य दक्षता अधिकारी मनोजकुमार सिंह, उप उपविभागीय अधिकारी हेमंत पांडे उपस्थित होते. संघटनेचे दिलीप बटवाल, विनोद जैन, सुशील कुमार राजेश सिंग, श्रेयश आचार्य, तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात मनोजकुमार सिंह यांनी दिल्ली येथील संबंधित विभागाशी संपर्क साधून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचे आश्वासन दिले. लवकरच या रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले जाईल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल.त वैद्यकीय सेवेचा प्रश्न सोडविल्याने हजारो कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. हेमंत पांडे यांनी उद्योग आणि विमाधारक व्यक्ती यांना त्यांच्या उत्तम आरोग्य आणि विमा सेवांचे आश्वासन दिले.
चाकण : कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे चाकण कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.