पिंपरी, दि. 21 – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे एका तरुणाने स्वतःच्याच घरात घरफोडी करून एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 18 जानेवारी रोजी उघडकीस आली.
निखिल संतोष सालके (वय 19, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संतोष हनुमंत सालके (वय 48) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा निखिल याने घरातील कपाटाच्या लॉकरचा स्क्रू तोडून कपाटातून 6.7 तोळे वजनाचे दागिने आणि 25 हजार रोख रक्कम असा एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 13 ते 18 जानेवारी या कालावधीत घडला. याबाबत संतोष यांनी आपल्या मुलाच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी निखिल याला अटक केली आहे.