आळंदी – इलेक्ट्रिक डीपीतील तांब्याच्या तारा आणि ऑईलची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करून आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगम मोलई राजभर (वय 19), मोहित तेजबहादुर सिंह (वय 29), आकाश अखिलेश चौबे (वय 19), ईबादततुल्ला शेख (वय 19, सर्व रा.उत्तरप्रदेश, सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर दोन साथीदार रिहमततुल्ला शेख, संभाजी गौतम फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मरकळ, कोयाळी, गोलेगाव परिसरातून शेतकऱ्यांनी शेती कामासाठी बसविलेल्या इलेक्ट्रिक डीपीतील तांब्याच्या तारा आणि ऑईल चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 18) अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी शुक्रवारी (दि. 20) पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत चोरटे सोळु खिंडीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला असता त्याठिकाणी चार जण आले. त्यापैकी एकाच्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी दिसून आली. त्यांना पकडून चौकशी केली असता पिशवीत डीपीतील तारा आणि ऑइल चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून डीपीतील तारा आणि ऑईल चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब जोंधळे, पोलीस हवालदार राजाराम लोणकर, पोलीस नाईक बाजीराव सानप, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खेडकर, कैलास गर्जे, गजानन आढे, विकास पालवे यांनी केली.