जळोची – बारामतीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. दिनांक 11 जानेवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हे अभियान होणार आहे. अशी माहिती बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली. या अभियानात शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा वेबीनारव्दारे रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात येईल तसेच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन वितरक व मोटार ड्रायव्हींग स्कूलचालक यांच्या सौजन्याने विविध ठिकाणी बॅनर लावण्यात येतील.
वाहनचालकांसाठी टोलनाक्यावर वाहनचालकांची नेत्रतपासणी करण्यात येईल. साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक बसविण्यात येतील तसेच, त्या वाहनचालकांचे प्रबोधनही करण्यात येणार असून ओव्हरलोड, परावर्तिका नसणे,वाहनांचे दिवे चालू नसणे, हेल्मेट, मोबाईलचा वापर, अवैद्य प्रवासी वाहतूक इत्यादी बाबींसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे केसकर यांनी सांगितले.