सिमला – बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर हिमाचलातील कॉंग्रेस मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला असून आज राज्यपालांनी सात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. नवीन मंत्र्यांच्या शेकडो उत्साही समर्थकांनी शपथविधी सोहळ्यादरम्यान राजभवनाच्या आधीच खचाखच भरलेल्या दरबार हॉलमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना नियंत्रित करणे पोलिसांना अत्यंत जिकरीचे ठरले.राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नवीन मंत्र्यांना शपथ दिली.
या शपथ विधी सोहोळ्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी अनपेक्षितरित्या मोठी गर्दी केली होती. त्यांनी राजभवनाबाहेर पारंपरिक संगीतावर नृत्य केले. राजभवनाकडे जाणारे सर्व रस्ते वाहने आणि गर्दीने व्यापून गेले होते.
वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच झगडावे लागले. समर्थकांनी दरबार हॉल मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने दोन दरवाज्यांच्या काचाही फुटल्याचा प्रकार घडला. सात सदस्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचे संख्याबळ नऊ झाले.
मुख्यमंत्री सखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी 11 डिसेंबर रोजी शपथ घेतली आणि त्यानंतर 28 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. हिमाचलाचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे पुत्र विक्रमादित्य यांचाही या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.