भारत आणि श्रीलंका नुकतीच ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. यामध्ये भारताने २-१ अशी बाजी मारण्यात यश मिळवले. या मालिकेसाठी संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. भारताने पहिला सामन्यात २ धावांनी रोमांचक विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या गचाळ गोलंदाजीमुळे संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात भारताने ९३ धावा राखून मोठा विजय मिळवला आणि मालिकाही खिशात घातली.
या सामन्यात भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी केली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करताना ५१ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने ११२ धावांची शतकी खेळी केली. भारताने सामना जिंकल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्राविड यांनी सूर्यकुमार यादवशी संवाद साधला. याचा इज व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये, द्रविड म्हणतात की, “सूर्यकुमारची फलंदाजी शैलीवरून असे वाटते की, त्याने लहानपणी माझी बॅटिंग पहिली नाही.” द्रविड यांनी असे म्हणताच दोघेही हसू लागले.
यावेळी द्रविड यांनी सूर्यकुमारबाद्दल बोलताना म्हटले की, सूर्या, तुझी सध्याची खेळण्याची लय पाहता त्याचा संघासाठी मोठा फायदा होईल. तुझी आजची खेळी ही मी पाहिलेली सर्वात बेस्ट खेळी आहे. तू संघासाठी नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतो. मागील वर्षभरातील तुझ्या दमादर खेळी मला पाहायला मिळाल्या आहेत. सूर्या, तू तुझ्या या खेळींपैकी एक किंवा दोन सर्वोत्तम खेळी निवडू शकतो का?”
द्रविड यांच्या या प्रश्नावर सूर्यकुमारने उत्तर दिले की,”मी मैदानावर खेळताना प्रत्येक कठीण परिस्थितीत खेळाचा आनंद घेतला आहे. त्यामुळे मी एखादी ठरविक अशी खेळी निवडू शकत नाही. मी फक्त खेळाचा आनंद घेत आहे. मागील वर्षभरात ज्याप्रमाणे कामगिरी केली तीच कामगिरी यापुढेही सुरूच ठेवेल. मी मैदानावर गेल्यावर डावाचा जास्त दबाव न घेता खेळावर लक्ष देतो. माझ्या कामगिरीमुळे संघाला मदत होत असेल तर त्यातच मी आनंदी आहे.”