नवी दिल्ली – अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद थांबताना दिसत नाहीये. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी टोमणा मारला. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या पेहरावावरून सुरू असलेल्या वादावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, ‘भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुस्लिमांचा आहे का?’
सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट खूप वादात सापडला असून त्यावरून बरेच राजकारण होत आहे. दीपिका पदुकोणच्या भगव्या कपड्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पठाण चित्रपटाच्या वादावर प्रतिक्रिया देताना जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले, “शाहरुख खानच्या नवीन चित्रपट ‘पठाण’मध्ये भगव्या रंगाचे कपडे घालण्यावरून वाद निर्माण झाला होता. याचा अर्थ भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुस्लिमांचा आहे का? हे काय आहे? गाय हिंदूंची आणि बैल मुस्लिमांची?
आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांच्या वक्तव्यावरही फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देशात द्वेष वाढला आहे हे खरे असले तरी देश सोडणे हा समस्येवरचा उपाय नाही. एकजूट राहून द्वेष संपवायचा आहे. हा देश वाचवायचा असेल तर सर्व धर्माच्या लोकांनी बंधुभाव पाळला पाहिजे. सिद्दीकी म्हणाले होते, ”देशातील मुस्लिमांसाठी वातावरण खराब आहे. मी परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांना देशात न परतण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, नंतर हा वाद वाढत गेल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.