दोहा :– कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य फ्रान्सने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा (France beats England) विजय मिळवला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
– तब्बल 40 वर्षांनंतर दोन्ही संघात झाली लढत
– इंग्लंडचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले
– हॅरी केन गोल करण्यात अपयशी ठरला
– केनच्या अपयशावर भर मैदानात फ्रान्सचा एम्बापे हसला
– एम्बापेच्या कृतीवर जगभरातून टीका
– इंग्लंडकडून मात्र, केनचे समर्थन
सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने मिळालेली पेनल्टी वाया घालवली व इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे त्यांचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हानही संपूष्टात आले.
यंदाच्या स्पर्धेत या दोन संघात तब्बल चार दशकांनंतर सामना झाला. या सामन्यात फ्रान्सच्या ऑरेलियन टिचोयुमेनी याने 18 व्या मिनिटाला गोल केला व फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पहिला हाफ संपेपर्यंत दोन्ही संघांना पुन्हा गोल करता आला नाही.
दुसरा हाफ सुरु झाला व इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने 54 व्या मिनिटाला गोल केला व संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यावेळी फ्रान्सपेक्षा इंग्लंडचे खेळाडू जास्त आक्रमण करताना दिसले मात्र, त्यांना गोल करता आला नाही.
दुसरा हाफ सुरु झाल्यावर गोल होत नाही यामुळे हा सामनाही बरोबरीत सुटणार असेच चित्र दिसत होते. परंतू सामन्याच्या 78 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऑलिव्हर जिरूड याने गोल केला व संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
सामना संपण्यासाठी अवघी काही मिनिटे बाकी असताना 84 व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. मात्र, कर्णधार हॅरी केन याला या पेनल्टलीचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही व इंग्लंडचा पराभव निश्चित झाला.
अशी रंगणार उपांत्य फेरी
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यात येत्या बुधवारी अर्जेंटिना व क्रोएशिया यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तर गुरुवारी फ्रान्स व मोरक्को यांच्यात लढत रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.