गांधीनगर :– गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा ( Vande Bharat Express Accident) जनावरांना धडकली आहे. ही दुर्घटना उदवाडा आणि वापी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या अपघातात वंदे भारत एक्स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी ही घटना घडली. मागील दोन महिन्यातील वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघाताची ही चौथी वेळ आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी या घटनेबाबात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उदवाडा-वापी या रेल्वेस्थानकांदरम्यान गेट क्रमांक 87 जवळ हा अपघात घडला. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले. या घटनेनंतर काही कालावधीसाठी रेल्वे थांबवण्यात आली होती.
दरम्यान, याआधी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी गुजरातमध्ये वाटवा व गैतापूरदरम्यान म्हशींच्या कळपाला धडक दिली होती. या अपघातात गाडीच्या इंजिनचे आणि पुढील भागाचे नुकसान झाले होते. या अपघातात चार म्हशी देखील ठार झाल्या होत्या. त्यानंतर धडक बसलेल्या म्हशींच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वेच्या भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे, त्याचा आधार घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Chhattisgarh : छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांच्या उपसचिवाला ‘या’ प्रकरणी ईडीने केली अटक
त्यानंतर 8 ऑक्टोबर 2022 रोजी कंझरी ते आणंद स्थानकांदरम्यान गायीला धडक दिली होती. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2022 रोजी अतुल रेल्वे स्थानकाजवळ बैलाला धडक दिल्याची घटना घडली होती. अशाप्रकारे वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघाताची ही चौथी वेळ आहे.