रायपूर – छत्तीसगढमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपसचिव सौम्या चौरासिया यांना अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. आयकर विभागाने गेल्या वर्षी जून महिन्यात छत्तीसगढमध्ये छापेमारी केली होती. त्यात शंभर कोटींच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
हवाला रॅकेटशी संबंधित ही प्रकरणे होती. बॅंकींग प्रणालीच्या बाहेर जात रोखीत व्यवहार झाल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. सौम्या चौरासिया यांच्या निवासस्थानावरही फेब्रुवारी 2020 मध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका मुख्यमंत्री बघेल यांनी केली होती.
त्यानंतर आता थेट अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चौरासिया यांच्या अटकेच्या अगोदर गेल्या काही महिन्यांत ईडी सक्रिय झाले असून सातत्याने कारवाई केली जाते आहे. काही व्यावसायिकांवरही छापे टाकण्यात आले आहेत.