कांकेर (छत्तीसगड) – झारखंड पोलिसांनी छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर मतदारसंघात 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवारावर बलात्कार प्रकरणात चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत. भाजप उमेदवारासह अन्य तिघांवर हे समन्स जारी करण्यात आले असून त्यांना कांकेर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ब्रह्मानंद नेताम असे या भाजप उमेदवाराचे नाव असून त्यांच्यावर झारखंडमधील जमशेदपूरच्या टेल्को पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
भारत जोडो यात्रेमुळे आपल्या स्वत:मध्ये चांगले बदल घडले – राहुल गांधी
तथापि, त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात हा गुन्हा लपवल्याचा आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप उमेदवार आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी झारखंड पोलिसांचे एक पथकही छत्तीसगडला पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पथकाने नेताम यांच्या घरावर समन्सची प्रत चिटकवली आहे.
दरम्यान, या प्रकारावर भाजपने आगपाखड केली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवाच्या भीतीने छत्तीसगडमधील कॉंग्रेस सरकारने झारखंड सरकारशी संगनमत करून भाजप उमेदवाराची बदनामी चालवली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.2019 मध्ये गुन्हा दाखल झाला तेव्हा झारखंड पोलिसांनी इतके दिवस कारवाई का केली नाही, असा सवालही भाजप नेत्यांनी केला.