सुसंस्कृत भावी पिढी घडवण्याचा संकल्प
पौड : भविष्याची तरुण पिढी सुसंस्कृत आणि संस्कारी व्हावी यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शिव-शंभुंचा इतिहास सांगणे गरजेचे आहे. मुलांना लहानपणापासूनच गडकोट दाखवत इतिहासाबाबत जागरुक करण्याची गरज शिवभक्त ऍड. संजय खैरे यांनी व्यक्त केली.
पौडमधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या सन 2002-2004 या वर्षांतील कला-वाणिज्य शाखेतील माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण तिकोणा गडावर झाले. यावेळी ऍड. खैरे बोलत होते. ते म्हणाले, पुढील वर्षी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होणार आहेत.
साडे तीनशे वर्षांची गुलामगिरीची मध्यरात्र संपवून स्वाभिमानाची प्रचिती मिळवून देणाऱ्या हिंदुस्थानाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या 350 व्या वर्धापनदिनाच्या भूमिकेत सारे वर्ष विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यानिमित्त 6 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित पुणे ते पानिपत दुचाकी अभिवादन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
तब्बल 20 वर्षांनी तिकोणा गडावर एकत्रित येवून या विद्यार्थ्यांनी वितुंडेश्वर महादेव मंदिरात शिववंदना करुन, गडावर स्वच्छता केली व दुर्गसंवर्धनासाठी आर्थिक मदतही केली. आगामी काळात याप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असून, आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्व सामान्यांच्या हितासाठी करण्याचा मानस सर्व विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी तिकोणापेठचे पोलीस पाटील अनंता खैरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल केदारी, प्रमोद हुलावळे, हरीष सोनवणे, विकास मळेकर, जनार्दन साठे, अंकुश भरम, आनंद कंधारे, महादेव कंधारे, गणेश भिलारे, राहुल भरम, गणेश भरम, कल्पना मेणे, सारिका कोंढरे, सारिका साठे, ज्योती कोंढाळकर, राजलक्ष्मी बलकवडे, प्रतिभा जाधव, सारिका बलकवडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.