कराड – वनवासमाची (ता. कराड) येथे ऊसतोड कामगारांना ऊस तोडताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. त्यातील एका बछड्याला मादी बिबट्या सोमवारी दि. 21 रोजी रात्री घेऊन गेली. मात्र, अजूनही दोन बछडे आईच्या प्रतीक्षेतच आहेत. वन विभागाकडून त्यांना आईच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न सुरु असून आज दि. 22 रोजी रात्री पुन्हा त्या दोन बछड्यांना ऊसाच्या शेतात सापडलेल्या ठिकाणीच पुन्हा ठेवण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अभिजीत व रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, योगेश शिंगण, तसेच रेस्क्यूचे श्रीनाथ चव्हाण, हर्षद व डॉ. कल्याणी यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. तसेच सर्व बछडे सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यांनतर या बछड्यांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
सोमवारी रात्री वन विभागाकडून बिबट्याचे बछडे ऊसाच्या शेतात सापडलेल्या ठिकाणीच त्यांना एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. बिबट्याच्या मादीला बछड्यांचा वास यावा, यासाठी बिबट्याच्या बछड्यांचे मूत्र उसाच्या शेतात विविध ठिकाणी शिंपडण्यात आले होते. रात्री सुमारे तीनच्या सुमारास मादी बिबट्या त्यातील एका बछड्याला घेऊन गेली. मात्र, त्यातील दोन बछडे अजूनही त्यांच्या आईच्या प्रतीक्षेत आहेत.
हे दोन्ही बछाडे वन विभागाच्या ताब्यात असून ते सुरक्षित असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच मादी बिबट्याची बछड्यापासून ताटातूट झाल्यामुळे आक्रमक होऊ नये, तसेच तिची व तिच्या बछड्यांची भेट घालून देण्यासाठी आज मंगळवारी रात्री पुन्हा त्या दोन बछड्यांना कॅरेटमध्ये ठेवून प्रयत्न करण्यात येणार आहेत.