खराबवाडीतील खुनाचा पोलिसांकडून 24 तासांत उलगडा
महाळुंगे इंगळे : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने पत्नीने बोलणे बंद केले. दरम्यान प्रेयसी देखील आपल्याला भाव देईना म्हणून त्याने प्रेयसीचा गळा चिरून, दगडाने ठेचून तिचा निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने तपास चक्र फिरवत आरोपीला पुणे येथून अटक केली. सुरुवातीला आरोपीने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसी खाक्यासमोर त्याची बनवाबनवी फार वेळ टिकली नाही.
राम कुंडलिक सूर्यवंशी (वय 39, रा. पवारवस्ती, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निकिता संभाजी कांबळे (वय 28, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खराबवाडी येथे एका शेतात झुडुपामध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. तिचा चाकूने गळा कापून तिच्या चेहऱ्यावर दगडाने मारून खून करण्यात आला होता. याबाबत महाळुंगे चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीची ओळख पटली नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
गुन्हे शाखा युनिट तीनने परिसरातील 90 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच परिसरातील घरमालक, भाडेकरू, कंपनीतील कामगार, सुपरवायझर, स्थानिक नागरिकांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान पोलीस अंमलदार ऋषीकेश भोसुरे आणि राजकुमार हनमंते यांना माहिती मिळाली की, खराबवाडी येथील एक तरुणी शनिवार रात्रीपासून बेपत्ता आहे. तिच्याबाबत माहिती काढत पोलिसांनी खून झालेल्या तरुणीची ओळख पटवली. पोलिसांनी तरुणीच्या फोनचे तांत्रिक विश्लेषण केले असता राम सूर्यवंशी या व्यक्तीबाबत पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी राम सूर्यवंशी याला पुणे येथील सिम्बायोसिस परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला राम याने निकिता ही आपली जवळची मैत्रीण असून तिला कुणी मारले, असे म्हणत दुःख व्यक्त केले. तो मोठमोठ्याने रडून पोलिसांची दिशाभूल करू लागला. मात्र, तो एवढा जास्त का दुःख व्यक्त करत आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करत गुन्हा उघडकीस आणला.
“भाव’ देत नव्हती म्हणून मारले
राम आणि निकिता हे चिंचवड मधील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तिथे त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी निकिताचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय रामला आला. ती त्याला भाव देत नसे. दरम्यान राम याच्या बायकोला त्याच्या निकिता सोबतच्या प्रेमसंबंधाबाबत समजले. त्यामुळे ती देखील राम सोबत बोलत नव्हती. या रागातून त्याने निकिताचा खून केला.