मानवी हक्क हा मालमत्तेच्या हक्कापेक्षा मूलभूत हक्क
पुणे, दि. 24 – खासगी मालमत्तेच्या हक्कापेक्षा मानवी हक्क अधिक मूलभूत आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1919 साली साउथ बरो कमिशनपुढे साक्ष देताना व्यक्त केलेला विचार आज नव्या घटना दुरुस्ती संदर्भात महत्त्वाचा आहे, असे विचार समाजकल्याण मंत्री व वाहतूक खात्याचे मंत्री दादासाहेब कस्तुरे यांनी बोलताना व्यक्त केले.
आमदार डॉ. मा. पं. मंगुडकर यांनी लिहिलेल्या “डॉ. आंबेडकर अँड पार्लमेंटरी डेमोक्रसी’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ न्यायमूर्ती भोळे यांचे अध्यक्षतेखाली कस्तुरे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी न्या. भोळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या मौलिक कार्याची माहिती दिली.
जगातील सर्वात स्वस्त नागरी वाहतूक
मॉस्को – आज मॉस्कोत बस, ट्रॉलीबस व ट्रामचे एकूण 400 मार्ग आहेत. विद्यमान पंचवार्षिक योजनेत (1976-80) त्यांच्यामध्ये आणखी 60 मार्गांची भर पडेल. तसेच भुयारी रेल्वेच्या आणखी दोन मार्गांवरून गाड्या धावू लागतील. या दोन मार्गांमुळे शहराच्या पूर्व व दक्षिण भागातील वस्त्या शहराच्या मध्यवर्ती भागास जोडल्या जातील.
या सर्व वाहतुकीचे नियंत्रण कॉम्प्युटरमार्फत होते. त्यामुळे वाहतुकीचा बोजा सर्व मार्गावर समान विभागला जातो. परिणामी वाहतूक अतिशय किफायतशीर ठरते. असाच प्रयोग इतर ठिकाणीसुद्धा लवकरच केला जाणार आहे. यामुळे स्वस्त नागरी वाहतूक करणे शक्य होते.